आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज्यातही दिल्ली मॉडेलची अंमलबजावणी!

आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज्यातही दिल्ली मॉडेलची अंमलबजावणी!

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. या निवडणुकीत २४ विधानसभा मतदारसंघात ‘स्वच्छ राजकारण’ आणि ‘नवीन राजकीय पर्याय’ देण्याच्या उद्देशाने तसेच जातीयवादी, मनी-मसल पॉवरच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याचं आपच्या नेत्यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्ली सरकारच्या मॉडेलवर आधारित धोरण समोर ठेवून आम आदमी पक्ष राज्याच्या ५ विभागात विधानसभा निवडणूक लढवत असल्याचंही आपच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

पक्षाच्या जाहीरनाम्यात पर्यावरण धोरणात जल, जमीन, जंगल, ऊर्जा आणि वायू या मुद्द्यांवर लक्ष देण्यात आला आहे. तसेच शिक्षण, आरोग्यसुविधा, निवारा, महिला सुरक्षा, त्याच प्रमाणे उद्योग, कृषी, दळणवळण या मुद्द्यांचा समावेश आहे.

राज्याची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि आम आदमी पक्ष राज्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असेल. दिल्ली राज्य सरकारच्या माध्यमातून ‘आप’ने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व-क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. हेच दिल्ली मॉडेल राज्यातील मुख्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी फायदेशीर ठरेल असं आपच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

“या जाहिरनाम्याच्या माध्यमातून राज्यातील विविध समस्यांना प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे त्यामुळे पूर्णतः नसले तरी दिल्ली मॉडेल काही प्रमाणात लागू करता येऊ शकते. आम्ही सत्तेत असू अथवा नसू परंतु दिल्ली मॉडेल रचनात्मक काम करण्यासाठी उपयोगी पडू शकेल.”, असे आप महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर मांदियान यांनी म्हटले आहे.

COMMENTS