भिमा कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढली, आठवलेंची घटली ?

भिमा कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढली, आठवलेंची घटली ?

मुंबई – भिमा कोरेगाव प्रकरणानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात प्रथम आवाज उठवला. तसचं त्यानंतर महाराष्ट्र बंदीची हाकही दिली. राज्याभरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तोडफोडीच्या काही घटना सोडल्या तर संप ब-यापैकी शांततेतही पार पडला. त्यामुळे दलित समाजात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भिमा कोरेगाव प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. याकूब मेनन याला लावलेली कलमे भिडे आणि एकबोटे यांच्याविरोधात लावण्याची मागणी केली आहे. हिंदुत्वावाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे प्रकाश आंबेडकरांना जास्त पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे. राज्यात आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांना टाळता येणार नाही अशी परिस्थिती तयार झाल्याचं कांही काँग्रेस नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगिंतलं.

त्यात रामदास आठवले यांनीही भीमा कोरेगाव प्रकरणी तातडीने प्रतिक्रिया दिली. मात्र सत्तेत असल्यामुळे सरकारविरोधात आणि हिंदुत्ववाद्यांविरोधात फारशी आक्रमक भूमिका घेतली नाही. त्यामुळे दलित समाजात त्यांच्याविरोधात काहीप्रमाणात का होईना असंतोष पसरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका कार्यकारणीने आठवलेंवर नाराजी दर्शवत राजीनामा दिला आहे. या असंतोषाची कुणकुण लागताच आठवले यांनीही प्रमुख कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत काय प्रतिसाद मिळतो आणि त्यानंतर आठवले काय भूमिका घेतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS