‘या’ मतदारसंघातून आदित्य ठाकरे लढवणार विधानसभेची निवडणूक ?

‘या’ मतदारसंघातून आदित्य ठाकरे लढवणार विधानसभेची निवडणूक ?

मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी केली आहे. देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे. तसेच हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे हे वरळी, जोगेश्वरी, किंवा शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. या तीनही मतदारसंघात भाजप, मनसेचा प्रभाव नाही. तसेच याठिकाणी मराठी मतदारांचा टक्का जास्त असल्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आदित्य ठाकरे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोअर कमिटीकडून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणुकांपूर्वीही अशी मागणी झाली होती. तसेच मतदारसंघही निश्चित करण्यात आला होता. परंतु खुद्द आदित्य ठाकरेंनीच या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून शिवसेनेकडून आता त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीव आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली जात आहे.

COMMENTS