अहमदनगर – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदारसंघ गाजणार असल्याचं दिसत आहे. त्यापैकीच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघ देखील गाजणार असल्याचं दिसत आहे. कारण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि मतदारसंघाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचं वर्चश्व आहे. तर 10 वर्षांपासून भाजप नेते राम शिंदे याठिकाणी आमदार आहेत. त्यामुळे भाजपचा हा गड भेदण्यासाठी रोहीत पवारांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर रोहीत पवार यांनी राम शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात काँटे की टक्कर होणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS