मुंबई – मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यांवरील खर्च वाढल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्र्यांना तंबी दिली आहे. सरकारी बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवा, अनावश्यक महागड्या वस्तूसाठी खर्च करु नका, अशी ताकीद अजित पवार यांनी दिली आहे.मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याची कंत्राटं देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अजित पवारांनी या विभागालाच खर्च आवरण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान वास्तुविशारदांच्या सल्ल्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यांवरील डागडुजीच्या खर्चात वारेमाप वाढ झाल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. 31 मंत्र्यांच्या बंगल्यांवर एकूण 15 कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याचा दावा केला जात आहे. प्रत्येक बंगल्यावर सरासरी 80 लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च होत आहे. सर्वात जास्त खर्च हा बाळासाहेब थोरातांच्या ‘रॉयल स्टोन’ आणि छगन भुजबळांच्या ‘रामटेक’ या बंगल्यावर होत असल्याची माहिती आहे. रॉयल स्टोनसाठी 1 कोटी 81 लाख, तर रामटेकसाठी 1 कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे.
तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सारंग’ बंगल्याचाही या खर्चात समावेश आहे. फडणवीसांच्या सारंग बंगल्यावर तब्बल 92 लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याची माहिती आहे.
त्यामुळे सरकारी बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवा, अनावश्यक महागड्या वस्तूसाठी खर्च करु नका, अशी ताकीद अजित पवार यांनी दिली आहे.
COMMENTS