मुंबई – अवघ्या काही तासात राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक 2 मंत्रीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
परंतु अशातच अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल झाले आहेत. उपमुख्यमंत्रीपदाचा अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. त्यामुळे अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक त्यांच्या घरी आणि धनंजय मुंडे यांच्या घरी जमले आहेत. अजित पवार धनंजय मुंडे यांच्या घरी येणार असल्याची चर्चा असल्याने तिथेही समर्थकांची गर्दी आहे. मात्र अजित पवार कुणालाही भेटायला तयार नसल्याची माहिती आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा फोनवरून संपर्क झाला असल्याची माहिती आहे. अजित पवार संध्याकाळी साडे पाच वाजता सिल्वर ओकवर येणार असल्याची माहिती आहे. तिथून सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र शपथविधी सोहळ्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS