थोरल्या पवारांचा ‘पॉवर’ गेम, कसे फसले देवेंद्र?

थोरल्या पवारांचा ‘पॉवर’ गेम, कसे फसले देवेंद्र?

अंबाजोगाई, परमेश्वर गित्ते – राज्याच्या राजकारणातील व सत्तास्थापनेतील पेच दूर करण्याकामी व सत्ता स्थापन करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. अजित पवार यांना गळाशी लावून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणले परंतु त्या पत्राची शहानिशा न करता सत्तेला आसुसलेल्या देवेंद्रांनी थेट पंतप्रधान यांना खडबडून जागे करून उठा, उठा, दिवाळी आली, सत्ता स्थापनेची घाई झाली. म्हणत त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळवला. त्यांनी रात्रीतून राष्ट्रपती राजवट हटवली. इकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शपथ द्यायला तयारच होते. त्यांनी संविधानाची किंवा भाजपच्या कुठल्याही विचाराचा विचार न करता थेट शपथ देत भल्या सकाळी महाराष्ट्राच्या उरात धडकी भरविण्याचे काम करत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लावली.

त्यानंतरचा प्रत्येक घटनाक्रम हा इंटरेस्टिंग राहिला. सत्तेच्या लालसेपोटी देवेंद्र अडकले आणि याचा हिमालय म्हणून ज्यांची ओळख अशा शरद पवारांच्या पॉवरगेममध्ये अडकले. देवेंद्रांनी जेवढा विचार केला नाही. त्याच्या पुढचा विचार पवारांनी केला आणि महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवली व सत्तेचा ताबा महाविकास आघाडीच्या बाजूने वळता केला. पवारांचा पॉवर गेम यशस्वी ठरला कारण विरोधकांच्या कळपामध्ये स्वतःचा माणूस पाठवून त्या ठिकाणचे हालहवाल घेतले आणि त्या ठिकाणी सुरुंग पाडण्याचे काम केले. अजित पवार आपले मिशन फत्ते करून आज राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. सत्तेची लालसा माणसाला कशी संपवते हे यावरून अवघ्या महाराष्ट्राने पाहिले.

पवारांच्या पॉवरगेममध्ये निश्चितच देवेंद्र हरले. पक्षाची प्रतिमा व स्वतःची विचारक्षमता या निमित्ताने दिसून आली. त्यामुळे देवेंद्र फसले कसे? असा प्रश्न निर्माण होतो.
राज्यात भाजपा-सेनेला बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार येईल. असे वाटत होते. परंतु शिवसेनेने स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाचे काय? असे अस्त्र बाहेर काढले आणि भाजपाला खिंडीत गाठले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या दरम्यान जो काही विषय, संवाद होता. तो उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे किंवा बंद खोलीत चर्चा करणे अपेक्षित होते. विजयाच्या दिवशी रात्री जाऊन ठाकरेंशी चर्चा किंवा संवाद करणे अपेक्षित होते. परंतु सत्तेच्या पुढे ना माणूस दिसला ना कोणी कार्यकर्ता दिसला. सत्ता एके सत्ता हीच कॅसेट त्यांनी वाजवली. मध्यस्थी करण्यासाठी पक्षनेतृत्व का आले नाही. हा प्रश्न शेवटपर्यंत जशास तसा राहिला.

अनेक घडामोडी घडल्या व कोणीही बहुमत किंवा सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने राज्यपाल कोशियारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. आता हटवण्याचा पेच महाविकास आघाडीसमोर होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस व शिवसेना हे तीनही पक्ष अत्यंत खंबीर, कणखर आणि बलवान झाले होते. सत्ता स्थापनेच्या संदर्भातील सर्व विषयांवर चर्चा, बैठक झाली. दावा करण्याच्या दिवशीच भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट हटवून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची वर्णी लावून मोठा धक्का देण्याचे काम केले. तत्पूर्वीची पार्श्वभूमी तपासली असता राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू केली होती. ती हटविण्याची जबाबदारी प्रामुख्याने पंतप्रधान यांच्यावर होती. दोन्ही महामहिम व्यक्ती या भाजपाच्या असल्याने राष्ट्रपती राजवट हटणे कठीण होते. राज्यपालांच्या व पंतप्रधानांच्या अख्त्यारितील बाब असल्याने कधी हटेल ही साशंकता होती. मग अशा काळात शरदचंद्र पवारांचा पॉवरगेम पुढे आला. त्यातून अजित पवार जर विरोधकांच्या गोटात जाऊन सामील झाले आणि त्या ठिकाणी 36 आमदार घेऊन स्वतंत्र गट निर्माण केला तर भाजपा व अजित पवारांची सत्ता येऊ शकते अशी बतावणी फडणवीस यांना करण्यात आली.

फडणवीस यांनी कशाचाही विलंब न करता थेट सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भल्या पहाटे शपथ घेतली. जे काही रणकंदन झाले ते महाराष्ट्राने पाहिले. आ. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून 11 आमदार अजित पवारांसोबत शपथविधीसाठी गेले. दरम्यानच्या काळात फडणवीस सरकार स्थापन झाल्याने राष्ट्रपती राजवट हटली. तिथून पवारांचा पॉवर गेम सुरू झाला. दुपारी 12 वाजेपर्यंत बहुतांशी आमदार स्वगृही परतले. दरम्यानच्या काळात अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज सर्व नेते त्यांच्याशी संपर्कात होते. तीन दिवस अनेक घडामोडी घडल्या. गेलेले सर्व आमदार राष्ट्रवादीत परतले. एकमेव अजितदादा फडणवीस सोबत राहिले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा फडणवीस सरकारच्या पूर्ण विरोधात आला आणि त्या निकालाने फडणवीसांचे तख्त पलटावले.

निकालानंतर अवघ्या काही क्षणात अजित पवारांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे सादर केला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा देऊन न्यायालयाचे स्वागत केले. एकूणच हा सर्व गेम शरद पवारांनी घडवून आणल्याचे दिसून आले. ज्या पद्धतीने अजित पवार विरोधकांच्या कळपात घुसले. त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट हटविण्यासाठी 54 आमदारांच्या सहीचे पत्र नेणे. हा सर्व प्रकार रचलेला होता. हे आता सिद्ध होऊ लागले आहे. कारण बॅक टू पॅव्हेलियन अजित पवार अवघ्या काही तासात परतले तेही पवारांच्या सिल्व्हर ओकवर हे कसे घडते. एकदा घर सोडून गेलेला माणूस परत येऊ शकतो का? हा प्रश्न आहे. परंतु पवारांनी रचलेल्या खेळामध्ये देवेंद्र फडणवीस फसले हे सिद्ध झाले. आजवर देवेंद्र सरस ठरले परंतु बाप माणसाच्या अनुभवामध्ये ते आडवे झाले. सत्ता व संपत्ती ही माणसाला आंधळं बनवत असते. तसाच प्रकार देवेंद्रांच्या बाबतीत दिसून आला. सत्तेशिवाय त्यांना कीही दिसले नाही. निवडणुकाअगोदर त्यांनी केलेली मेगाभरती ही सगळ्यात मोठी घोडचूक होती. म्हणूनच भाजपाचा पूर्वीचा 122 चा आकडाही मोजता आला नाही. उलट सर्व संस्थानिकांना सोबत घेऊन देखील मजल मारता आली नाही. ही शोकांतिका आहे. बारामतीच्या हिमालयाने नागपुरी तख्त हलवले आहे. एवढे मात्र खरे!

लेखक अंबाजोगाई येथील दै. वार्ता या वृत्तपत्राचे संपादक आहेत.

COMMENTS