काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळं लढणार ? अजित पवार यांची प्रतिक्रिया !

काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळं लढणार ? अजित पवार यांची प्रतिक्रिया !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची काल बैठक पार पडली. या बैठकीत काही नेत्यांनी वेगळं लढलं पाहिजे असा सूर लावला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे असं मत व्यक्त करतात त्यांच्या मताला काहीही किंमत नाही. आम्ही काँग्रेसला मदत केली हे त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना विचारा. एकत्रच राहीलं पाहिजे त्यातच दोघांचंही भलं आहे. काँग्रेसने काय चर्चा करावी हा काँग्रेसचा विषय आहे. पण बैठकीनंतर असे लोक बोलतात की जे कुठे नगरपालिकेतही निवडून येणार नाहीत. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठ अपयश मिळालं. राज्यात काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. या दारुण पराभवानंतर काँग्रेस आता विधानसभेच्या तयारीला लागली आहे. काल काँग्रेसची टिळक भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर पहायला मिळाला असून काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे.आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाही, अशी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली आहे. तसेच राष्ट्रवादी भाजपला मदत करते, त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असा सूर काँग्रेस बैठकीत उमटला आहे. तसेच त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी असाही सूर या बैठकीत पहायला मिळाला. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नांदेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

कालच्या बैठकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नांदेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा आढावा बैठकीतच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्यामुळे खळबळ उडाली. नांदेडमधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. राजीनामे स्वीकारून नव्या नियुक्त्या कराव्यात अशी राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विनंती केली आहे.

COMMENTS