मोहिते पाटलांनी सुरु केलेला अकलूजचा लावणी महोत्सव होणार बंद !

मोहिते पाटलांनी सुरु केलेला अकलूजचा लावणी महोत्सव होणार बंद !

अकलूज – अकलूजच्या जयसिंह मोहित पाटलांनी सुरु केलेला लावणी महोत्सव आता बंद होणार आहे. या महोत्सवाचं हे शेवटचं वर्ष असणार आहे. १९९३ साली जयसिंह मोहिते पाटलांनी हा महोत्सव सुरु केला होता. लोककलावंतांना समाजात मान मिळवून देणे आणि त्यांचा गौरव करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु आमचा हा उद्देश सफल झाला असून “अकलूजच्या लावणीस्पर्धेने विशिष्ट अशी उंची गाठली आहे. या उंचीवरच ही स्पर्धा बंद करणे आम्ही उचित समजले. स्पर्धा सुरू करण्यामागचा आमचा हेतू कधीच सफल झाला असल्याचं जयसिंह मोहीते पाटलांनी म्हटलं आहे.

या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पूर्वीच्या काळी लावणी-तमाशा म्हटलं की नाकं मुरडली जायची अशा विपरीत परिस्थितीच्या काळात अकलूजच्या जयसिंह मोहिते पाटलांनी हा महोत्सव सुरु केला होता.  विशेष म्हणजे ‘मोहिते पाटील घराण्याचा राजकीय आणि सामाजिक जाणिवांचा समृद्ध इतिहास पाहता हे आगंतुक आणि अनाठायी धाडस आहे’ असा एक प्रवाद तेंव्हा सुरु होता. लावणी महोत्सव सुरू करताना अशी चित्रविचित्र कुजबूज सुरू होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत चक्क आपल्या मातोश्री रत्नप्रभादेवी यांच्या हस्ते उद्घाटन करून जयसिंह मोहिते यांनी ही स्पर्धा सुरू केली. या महोत्सवाच्या मंचावर जयसिंहजींचे वडील सहकारमहर्षी कै. शंकररावजी मोहिते पाटील यांची छबी असणारा मोठा लोगो होता. लावणी महोत्सवाच्या प्रेक्षकांत जयसिंहजींच्या पत्नीसह मोहिते पाटील कुटुंबातील महिला वर्ग आणि अनेक मातब्बर घराण्यातील महिला आवर्जून उपस्थित असायाच्या. “बायकोसोबत लावणी बघणारा मी घरंदाज पाटील” असे ते अभिमानाने सांगायचे.

एवढच नाही तर या महोत्सवादरम्यान आपल्या मातोश्री आणि पत्नीच्या हस्ते कलावंतांना साडी-चोळी करून सन्मानित करण्याची रीतही त्यांनी जोपासली होती. हे काही तरी आगळे वेगळे होते, हा उत्कट अविस्मरणीय आणि मनःपूर्वक प्रतिसाद पाहून सहभागी तमासगीर मंडळी अक्षरशः भारावून गेल्या होत्या. या मंचावर आपल्या पावलांची जादू दाखवावी असं प्रत्येक कलावंताला वाटू लागले. या मंचाने लावणीच्या लोकप्रियतेला गगनास भिडवले. यापासून प्रेरणा घेत बांद्यापासून ते चांद्यापर्यंत राज्यभरात महिला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लावणी-तमाशाचे खेळ होऊ झाले. महिला लावणी पाहण्यास येऊ शकतात आणि त्यात गैर काहीच नाही हे या महोत्सवाने लोकमानसात ठसवले. अनेक कलावंतांना या मंचाने प्रसिद्धीचे जादुई वलय दिले. आयुष्यभर घुंगरांचे ओझे वागवून थकलेल्या अन परिस्थितीने हतबल केलेल्या अनेक पावलांना मदतीचा हात या महोत्सवानं दिला. या मंचाने लोकनाट्य कला केंद्रांना जी उभारी दिली ती अतुलनीय आणि शब्दातीत आहे.

मोहिती पाटलांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अलीकडील काळात मरगळ येऊ घातलेल्या या कलाप्रकारास पुन्हा उतरती कळा लागण्याची भीती वाटत असल्याचं कलावंत म्हणतायत. सध्या राज्यात ७५ थिएटरमधून सुमारे २५० लावणी पार्ट्या या क्षेत्रात काम करत आहेत. पूर्वी विशिष्ट अशा जाती- समाजातील कलावंत या क्षेत्रात असायचे. त्या समाजातील महिला-मुली शिक्षणाकडे वळल्याने लावणीकडील ओढ कमी झालेली दिसत आहे. तर ज्या उच्चवर्णीय जातीतील मंडळी याला नाके मुरडत होती त्याच समाजातील मुलींनी या कलाप्रकाराच्या आर्थिक उत्पन्न आणि ग्लॅमर मिळवून  देणाऱ्या व्यावसायिक स्वरूपावर ताबा मिळवल्याचे दृश्य आहे. त्याच वेळी मूळ लोकनाट्य कलाकेंद्राच्या ढासळत्या ढाच्यासाठी या संधीसाधू लोकांनी काहीही केलं नाही हे सत्यही डोळ्याआड करता येत नाही.  त्याशिवाय संगीत व्यावसायिक कलावंतांचे स्टेज शो वाढत चालल्याने तिकडे कल वाढत आहे. अशा काळात लावणी महोत्सवाची अखेर होत असल्याची घोषणा नैराश्यजनक असल्याची भावना कलावंत व्यक्त करत आहेत.  त्यामुळे मोहिते पाटलांनी हा महोत्सव बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली जात आहे.

COMMENTS