मागील निसटत्या पराभवाची उणीव भरून काढणार, काँग्रेसच्या युवा नेत्याचं भाजपच्या दिग्गज आमदाराला आव्हान !

मागील निसटत्या पराभवाची उणीव भरून काढणार, काँग्रेसच्या युवा नेत्याचं भाजपच्या दिग्गज आमदाराला आव्हान !

अकोला – विधानसभेच्या 2014 मधील निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाची उणीव भरून काढण्याचं आव्हान काँग्रेसच्या युवा नेत्यानं भाजपच्या दिग्गज आमदाराला दिलं आहे. मागील निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवामुळे अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. महेश गणगणे यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे महेश गणगणेंचं सर्वात मोठं आव्हान भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यापुढे आहे. त्यामुळे भारसाकळे हे आव्हान कसं पेलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. हिच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आकोट मतदारसंघातील राजकारण तापत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. तर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने दर्यापुरचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना अकाेट मतदारसंघातून उमेदवारी देऊन सेनेच्या गडाला खिंडार पाडण्याचे काम केलं होतं. त्या निवडणुकीत आमदार भारसाकळे यांना काँग्रेसचे महेश गणगणे यांनी टक्कर देऊन आमदार संजय गावंडे यांना तिसऱ्या स्थानावर ठेवले होतं. त्यामुळे यावेळेस गणगणे हे भारसाकळे यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. संजय गावंडे यांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्यामुळे या मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिहेरी रंगत पहायला मिळणार आहे.

 

COMMENTS