गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात शासकीय दारूबंदी आहे. अशा जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा कारभार चांगला चालण्यासाठी सरपंच आणि सदस्य दारू पिणारे नसणे आवश्यक आहे. म्हणून ‘दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणूक’ हे अभियान सुरू करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच दारुचे व्यसनी नकोत. त्यासाठी त्यांना निवडून देणारे मतदार नशेत नको. म्हणून येणारी ग्रामपंचायत निवडणूक दारुमुक्त ठेवण्याचे आवाहन दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी केले आहे.
सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावातील वातावरण तापले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गावा-गावातील स्त्रिया आणि मुक्तीपथ संघटना आपले गाव दारुमुक्त करत आहेत. एक हजार गावांतून दारूबंदीच्या समर्थनाची निवेदने शासनाकडे गेली आहेत. सर्व गावांमध्ये सभा घेऊन गावाचा प्रस्ताव घेण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीचे पॅनेल आणि उमेदवारांकडून दारू न पिण्याचा आणि न वाटण्याचा वचननामा लिहून घेण्यात येईल. वचन न देणार्याव उमेदवाराला मत देण्यात येणार नाही. या पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्षांच्या उमेदवारांनी वचननामे दिले होते. शेकडो गावातील स्त्रियांनी प्रस्ताव पारित केले होते की ‘जो पाजील माझ्या नवर्यााला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ या अभियानामुळे जिल्ह्यातील निवडणुका जवळपास दारुमुक्त राहिल्या. आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या दरम्यान गावागावात दारू पिणारे, पाजणारे निवडून येण्याचा प्रयत्न करतील.
निवडणुक दारुमुक्त, तर ग्रामपंचायत दारुमुक्त. म्हणून गावागावातील स्त्रिया, मुक्तीपथ संघटना, गाव आणि जागृत नागरिकांनी ‘दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणूक’ हे अभियान चालवावे. गाव दारुमुक्त करण्याची ही उत्तम संधी मतदारांना व स्त्रियांना आहे. ‘जो पितो दारू, जो पाजेल दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ अशी घोषणा सर्वांनी द्यावी व ग्रामपंचायत दारुमुक्त करावी, असं आवाहन दारुमुक्ती संघटनेने केलं आहे.
COMMENTS