नवी दिल्ली – अमित शाहांनी लिहिलेल्या पत्राला चंद्राबाबू यांनी उत्तर दिलं असून भाजपा आंध्र प्रदेश सरकारबाबत खोटी माहिती पसरवत असून अमित शहांनी आपल्याला लिहिलेल्या पत्रातील माहिती खोटी असल्याचा पलटवार केला आहे. शहांनी त्यांच्या पत्रात आंध्रला केंद्राने अनेक वेळा निधी दिला असून आम्ही त्याचा उपयोग केला नाही असे म्हटले आहे. यावरुन आमचे सरकार आंध्रचा विकास करण्यात सक्षम नाही असेच त्यांनी याद्वारे सुचवले आहे. परंतु आमच्या सरकारचा जीडीपी उत्तम असून कृषी क्षेत्रासह अनेक पुरस्कार आम्ही पटकावले असल्याचं चंद्राबाबू यांनी म्हटलं आहे.
काय म्हणालेत अमित शाह
चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय हा दुर्दैवी असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. याबाबत अमित शाह यांनी चंद्राबाबूंना पत्र लिहिलं होतं. तुम्ही एनडीएतून बाहेर पडण्याबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. एनडीएतून बाहेर पडण्याचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आणि एकतर्फी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या विकासाबाबत मोदी सरकार कटिबद्ध असून त्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. भाजपा नेहमीच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारा पक्ष असून हीच आमची प्रेरणा असल्याचंही शाह यांनी म्हटलं आहे.
This decision is both unfortunate & unilateral. It's a decision;I am afraid, will be construed as being guided wholly & solely by political considerations instead of developmental concerns: Amit Shah in a letter to #AndhraPradesh CM Chandrababu Naidu on TDP's decision to quit NDA pic.twitter.com/pSnAm01quU
— ANI (@ANI) March 24, 2018
दरम्यान या पत्रातून अमित शाह यांनी काँग्रेसवरही टीका केली असून काँग्रेसमुळेच तेलुगू जनतेची अवहेलना होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आम्ही सातत्याने तेलुगू जनता आणि तेलुगू राज्याच्या हिताबाबत विचार केला आहे. काँग्रेसने राज्याचे विभाजन करताना लोकांच्या हिताची काळजी घेतली नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.तसेच चंद्राबाबूंना त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करून देत जेव्हा तुमच्याकडे राज्यसभा आणि लोकसभेत पुरेशा जागा नव्हत्या. तेव्हाही भाजपाने राज्यातील लोकांना न्याय देण्याच्या विषयांना सभागृहात प्राथमिकता दिली होती. आणि यापुढेही दिली जाईल असंही शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शाह यांनी लिहिलेल्या पत्राला लगेचच चंद्राबाबू यांनी उत्तर दिलं असून त्यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. त्यामुळे एडीएतून बाहेर पडल्यानंतर आता भाजप आणि टीडीपीमध्ये वाद रंगत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS