नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांनी आज अखेर उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानातील उपोषण अण्णांनी मागे घेतलं आहे. यावेळी मुख्यमंत्री, कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. परंतु अण्णांच्या मागण्यांना मात्र सरकारकनं वाटाण्याच्या अक्षताच लावल्या असल्याचं पहावयास मिळालं आहे. केंद्र सरकारने त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या नसून लोकपाल/लोकायुक्त नियुक्तीला कालबद्ध दिला नाही, तसेच कृषी मुल्य आयोगाला स्वायत्त दर्जाही देण्यात आला नसल्याची माहिती आहे.
दरम्यान शेतक-यांच्या उपकरणांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ करण्यात येणार असून याबाबत ४ महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच जीएसटी बैठकीत मुद्दा मांडला जाणार असल्याची घोषणा गजेंद्र शेखावत यांनी केली आहे. तसेच राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेणार असून याबाबतचे मुद्दे निवडणूक आयोगाकडे पोहचवले जाणार असल्याचंही गजेंद्र शेखावत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ६ महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. तर सर्व मागण्या मान्य केल्या असून पंतप्रधान मोदी आणि अण्णा हजारे या दोघांची इच्छा शेतक-यांचं भलं करण्याचीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
COMMENTS