अरविंद केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना ट्वीट, “कृपया दिल्ली सरकारला काम करु द्या !”

अरविंद केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना ट्वीट, “कृपया दिल्ली सरकारला काम करु द्या !”

नवी दिल्ली दिल्लीचे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी ट्वीट केलं असून “सर, आयएएस अधिकाऱ्यांचा संप मिटवा आणि कृपया दिल्ली सरकारला कामं करु द्या” अशी मागणी केली आहे. आप नेत्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस असून केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्ली सरकारशी असहकार पुकारल्याचा आरोप करत नायब राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. यादरम्यान आज केजरीवाल यांनी ट्वीट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान चार महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सचिवालयात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की केली होती.  यानंतर दिल्लीच्या आयएएस अधिकाऱ्यांनी सरकारशी असहकार पुकारला आहे. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे दिल्लीचं कामकाज ठप्प झालं असून या सगळ्या प्रकरणात उपराज्यपाल अनिल बैजल यांनी हस्तक्षेप करुन आयएएस अधिकाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश देण्याची मागणी आपनं केली आहे.  त्यासाठी बैजल यांच्या कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गोपाल राय आणि सत्येंद्र जैन यांनी उपोषण सुरु केलं आहे.  त्यानंतर आज केजरीवाल यांनी ट्वीट केलं असून पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून आयएएस अधिकाऱ्यांचा संप मिटवा आणि कृपया दिल्ली सरकारला कामं करु द्या असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे केजरीवालांच्या ट्वीटनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS