नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या तिस-या दिवशीही विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सोमवार आणि मंगळवारीही कामकाज तहकूब करण्यात आलं. आजच्या तिस-या दिवशीही विरोधक आक्रमक झाल्याचं पहावयास मिळालं आहे. बोंडअळीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरलं. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे फडणवीस सरकार अडचणीत सापडत आहे. परंतु त्यातच भाजपच्याच एका आमदारानं आज थेट विधानसभेतच सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बोंडअळीच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांसोबत वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केल्याचं पहावयास मिळालं आहे.
२९३ च्या प्रस्तावातील नाव वगळल्यानं आशिष देशमुख नाराज झाल्याची माहिती आहे. शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्षानं २९३ चा प्रस्ताव दिला आहे. परंतु या प्रस्तावात आशिष देशमुख यांचं नाव नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी आशिष देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट विरोधकांच्या वेलमध्ये जाऊन सरकारविरोधातच जोरदार घोषणाबाजी केली. यापूर्वी सरकारी पक्षाच्या प्रत्येक चर्चेत आशिष देशमुख यांचं नाव होतं. परंतु यावेळेस नाव नसल्यामुळे ते नाराज झाले आहेत.
आज सभागृहामध्ये बोंडअळीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजपच्याच आमदाराने सरकारविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे विधानसभेचं सभागृह हादरून गेलं होतं. यापूर्वी भाजपचे खासदार नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर भाजपमधील आणखी काही आमदार फडणवीस सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आज सभागृहातच भाजपच्या आमदारानं जाहीरपणे सरकारविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे फडणवीस सरकारच्या अडचणी वाढत असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS