आशिष देशमुख यांचं जयंत पाटलांना पत्र, भाजप-शिवसेना सरकारवर गंभीर आरोप !

आशिष देशमुख यांचं जयंत पाटलांना पत्र, भाजप-शिवसेना सरकारवर गंभीर आरोप !

मुंबई – भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच गेली चार वर्षांपासूनच्या सरकारच्या कामगिरीवरही देशमुख यांनी टीका केली आहे. हे पत्र जशास तसे जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्वीटरवर शेअर केलं आहे. आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आशिष देशमुख यांनी लिहिलेले पत्र प्राप्त झाले. भाजपाचे सदस्य म्हणून देशमुख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरमधून विधानसभेवर निवडून आले होते. मात्र या सरकारच्या सर्व पातळ्यांवरील अपयशामुळे वैतागून अखेर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचं ट्वीटमध्ये जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच विदर्भाच्या प्रश्नांवर  देशमुख यांनी पत्रात सविस्तर मांडणी केली असून, विदर्भाच्या परिसरातील एमआयडीसीमध्ये एकही नवीन रोजगार आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने केलेले हे विधान भाजपा समर्थकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आशिष देशमुख यांना आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यापूर्वी त्यांच्या काटोल मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे शरद पवार यांचे राजकीय विरोधक होते. तर राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाही. त्यामुळे देशमुख यांना आगामी निवडणुकीत काँग्रेसकूडून कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS