आमदार अनिल गोटेंनी दोन अटींवर राजीनामा घेतला मागे !

आमदार अनिल गोटेंनी दोन अटींवर राजीनामा घेतला मागे !

मुंबई- पक्षावर नाराज असलेले भाजपचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांनी आज राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु गोटे यांनी नरमाईची भूमिका घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे.

अनिल गोटे यांनी दोन अटींवर राजीनामा मागे घेतला असल्याची माहिती आहे. गुन्हेगारांना भाजपात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आमदार अनिल गोटेंच्याच नेतृत्वात लढवल्या जातील या अटी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला असल्याचं गोटेंनी म्हटलं आहे. तसेच  यामध्ये दगाफटका झाला तर आपण पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशाराही गोटे यांनी दिला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर नाराजी व्यक्त करुन गोटे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. तसेच पक्षात गुंडांना प्रवेश दिला जात असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी आज गोटे यांच्या अटी मान्य केल्या आहेत.

 

COMMENTS