नागपूर – भाजपवर नाराज असलेले आमदार आशिष देशमुखही सध्या नाना पटोलेंच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. काणर सध्या ते दिल्लीमध्ये गेले असून काँग्रेसच्यान नेत्यांची ते भेट घेत आहेत. त्यामुळे लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. गेली अनेक दिवसांपासून ते भाजपच्या नेतृत्वावर नाराज आहेत. शेतक-यांसाठी सरकारविरोधात त्यांनी अनेकवेळा आंदोलन केलं आहे. त्यामुळे आता आशिष देशमुख हे लवकरच काँग्रेसची वाट धरणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान आशिष देशमुख यांच्यासोबत त्यांचे वडील व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखही दिल्लीला आहेत. या भेटीदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाली नसून त्या दोघांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. तसेच आशिष देशमुख यांचा काँग्रेस प्रवेशाचा पेच विधानसभा मतदारसंघावरून निर्माण झाला असून आशिष देशमुख सध्या नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु हा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेलेला आहे. त्यामुळे देशमुख यांनी सावनेरवर दावा केला आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व सुनील केदार हे करत आहेत. परंतु केदार आणि अशोक चव्हाण यांच्यात मतभेद असल्यामुळे देशमुख यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे सावनेरमधून देशमुख यांना उमेदवारी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS