काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी, 288 मतदारसंघाचा आढावा – अशोक चव्हाण

काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी, 288 मतदारसंघाचा आढावा – अशोक चव्हाण

फेक न्यूजच्या नावाखाली माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

मुंबई – काँग्रेसनं आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली असून एकंदर राजकीय स्थितीबाबत चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.राज्यातील सर्व 288 मतदारसंघाचा आढावा आम्ही घेत असून आघाडीबाबत राहुल गांधी आणि शरद पवार यांची या महिन्यात बैठक होणार असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्याआधी प्रदेश काँग्रेस राहुल गांधी यांना आपला अहवाल सादर करणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान फेक न्यूजच्या नावाखाली माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची जोरदार टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. सरकारच्या सोयीच्या बातम्या येत नाहीत म्हणून फेक न्यूजच्या नावाखाली दबाव आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच आता हा निर्णय मागे घेतला असला तरी भविष्यात सरकार याबाबत पावलं उचलण्याची भीती असल्याचंही ते म्हणाले आहे. तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वारंवार केलेल्या वाढीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरात कपात झाली होती तेव्हा सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिला नसून सगळ्यात जास्त दर हे महाराष्ट्रात़ असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच 48.2 टक्के एवढा केंद्र व राज्य सरकारचे कर असून सर्व क्षेत्रात या दरवाढीचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसत असून व्हॅट आणि उत्पादन शुल्क वाढवल्याने ही दरवाढ झाली असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल हे जीएसटीमध्ये आणावे अशी आमची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच लोकांच्या खिशातून पैसा काढण्याचा सपाटा सरकारने लावला असून सरकारने ही दरवाढ मागे घेतली नाही तर काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

COMMENTS