मुंबई – खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहित आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख माझ्यासारख्या देशातील साईभक्तांना झाले असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
या संदर्भात बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सवयीप्रमाणे शिर्डीत येऊनही खोटे बोलले. युपीए सरकारने चार वर्षाच्या काळात 25 लाख घरे बांधली व तेवढ्याच कालावधीत एनडीए सरकारने 1 कोटी 25 लाख घरे बांधल्याचा खोटा दावा करून पंतप्रधानांनी देशातील जनतेची दिशाभूल केली आहे. 2004 ते 2013 या युपीए सरकारच्या कालावधीत इंदिरा आवास योजनेअंतर्गत 2 कोटी 24 लाख 37 हजार घरे बांधली. म्हणजेच युपीए सरकारच्या काळात प्रतिवर्ष 25 लाख घरे बांधून पूर्ण केली. मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेचे दिलेले उद्दिष्ट्य अद्याप पूर्ण करता आले नाही. हे त्यांच्या सरकारने दिलेल्या आकडेवारीवरूनच सिध्द झाले आहे.
युपीए सरकारच्या काळात सन 2013 साली राजीव आवास योजना कार्यान्वित झाली. या योजने अंतर्गत एका वर्षात 1.17 लाख घरे बांधण्यात आली. मोदी सरकारने या योजनेचे नाव बदलून सरदार पटेल राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण मिशन केले व 2022 पर्यंत दोन कोटी घरे बांधण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात 10 जुलै 2017 पर्यंत फक्त 1.33 लाख घरे बांधली. 2008 ते 2013 या काळात युपीए सरकारने 1 कोटी 28 लाख 92 हजार घरे बांधून पूर्ण केल्याचे 2014 च्या कॅगच्या अहवालात नमूद केले आहे. तरीही शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी येऊन पंतप्रधान खोटे बोलण्याचे दुःसाहस करत आहेत. आता साईबाबांनीच पंतप्रधानांना खरे बोलण्याची सद् बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आपण साईबाबांना करणार असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.
COMMENTS