शरद पवार पुणे लोकसभेची जागा लढण्याच्या बातमीवरुन अशोक चव्हाणांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया !

शरद पवार पुणे लोकसभेची जागा लढण्याच्या बातमीवरुन अशोक चव्हाणांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक बारामतीऐवजी पुणे मतदारसंघातून लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे एकत्र बसून चर्चा झाल्याशिवाय काहीच सांगता येणार नसल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती होण्याची शक्यता आहे. तशा परिस्थितीमध्ये पवार महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.2014 नंतर लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा पवार यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी मागची निवडणूक लढवली नव्हती. ते राज्यसभेत गेले होते. मात्र संभाव्य राजकीय स्थिती लक्षात घेता 2019 मध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. तसच भाजपच्या सुमारे 100 जागा कमी होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 150 च्या आसपास जागा मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे अशा स्थितीत पवार लोकसभेत असणं गरजेचं आहे असं राष्ट्रवादीला वाटतंय. त्यामुळेच ते पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मावळमध्ये राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नाही. त्यामुळे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. एका  खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी आपल्या मुलांनी राजकारणात येऊ नये अशी आपली इच्छा आहे. मात्र आजची पिढी त्यांना हवा तो निर्णय घेऊ शकतात असं सांगितलं. त्यावरुन जर पक्षाने सांगितलं तर पार्थ लढवू शकतात असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. असं झालं तर पुणे जिल्ह्यातील चार पैकी 3 मतदारसंघातून पवारांचे कुटुंबिय निवडणूक लढव्याची शक्यता आहे.

त्यामुळे शरद पवार हे पुणे लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणाक का? हे काँग्रेससोबत चर्चा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या जागेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होणा-या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS