मुंबई- बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने वेळोवेळी हे सांगितले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त सांस्कृतीक संघटना राहिली नसून ती एक राजकीय संघटना झाली आहे. केंद्र आणि विविध राज्यातील भाजप सरकारमध्ये संघाचे लोक महत्त्वाच्या हुद्द्यावर बसले आहेत. विविध संस्थावर संघाचे लोक नेमले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राजकीय संघटना आहे. केंद्र आणि विविध राज्यात या संघटनेच्या विचारांचे आणि त्यांच्या इशा-यावर चालणारे सरकार आहे. म्हणूनच संघ आणि संघाशी संलग्न विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांच्या कारवाया भाजप सरकारच्या काळात वाढल्या आहेत.
सीआयए ही गुप्तचर संघटना असल्यामुळे या संघटनाबाबत त्यांच्याकडे नक्कीच काही गुप्त अहवाल, पुरावे असतील. ते मागवून घ्यावेत आणि त्याची पडताळणी करून या संघटनांवर कायदेशीर कारवाई करायला हवी. पण विद्यमान सरकारमध्ये या संघटनांच्या विचारांचे लोक असल्याने ते या संघटनांच्या विघातक कारवायांवर पांघरून घालत आहेत, किंबहुना या संघटनांना सरकारचा पाठिंबा असल्याने त्यांच्या गुप्त कारवायांना आळा घालण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. CIA चा अहवाल पुराव्यानिशी देशातील जनतेसमोर आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
COMMENTS