औरंगाबाद – कचरा प्रश्नावरुन शिवसेना आमदाराचे शिवसेना-भाजपवरच गंभीर आरोप !

औरंगाबाद – कचरा प्रश्नावरुन शिवसेना आमदाराचे शिवसेना-भाजपवरच गंभीर आरोप !

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये सध्या कचरा प्रश्न चांगलाच पेटला असल्याचं दिसत आहे. अशातच शिवसेनेचे आमदार शिरसाठ यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेलाच घरचा आहेर दिला आहे. कचरा प्रश्न सोडवण्यात शिवसेना-भाजप सत्तेत असताना अपयशी ठरले असल्याचा आमदार संजय शिरसाठ यांनी आरोप केला आहे. सततच्या दुर्लक्षामुळेच हा कचरा प्रश्न पेटला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कचरा टाकण्यासाठी महापालिकेनं जितक्या जागा शोधल्या त्या सगळ्या माझ्या मतदारसंघातील असल्याचंही आमदार शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझ्या मतदारसंघात कचरा टाकू देणार नसल्याचं  संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे. तसेच हा कचरा प्रश्न बागडे आणि रावसाहेब दानवे यांच्या राजकारणामुळे पेटला असून काल झालेल्या दगडफेकीत पोलिसांनी लोकांवर अत्याचार केला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनाही मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांचा निषेध करत असल्याचंही शिरसाठ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औरंगाबाद कचरा प्रश्नावरून शिवसेनेतच राजकारण रंगले असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान पडेगाव मिटमिटामध्ये काल नागरिकांनी जाळपोळ आणि दगडफेक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर आज गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 24 आंदोलकांसह हजार ते बाराशे आंदोलकांवर 307 म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील वातावरण आणखी तापलं असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS