बाळा नांदगावकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा !

बाळा नांदगावकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा !

मुंबई – मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. भाजपाच्या गुंडांना आवरा, नाहीतर संघर्ष अटळ आहे, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे. पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर नांदगावकर यांनी हा इशारा दिला आहे.

दरम्यान याबाबत नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून यामध्ये गृहखात्याने तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी. अन्यथा आम्ही दखल घेतली तर संघर्ष वाढू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.तसेच पोलीस प्रामाणिकपणे त्यांचं काम करतील ही अपेक्षा असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?

पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना 29 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता घडलेली आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतं.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले असून प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. कामोठे पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS