बीड – सध्या राजकाणामध्ये येणं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं खूप अवघड आहे. राजकारणामध्येही चुरशीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत निवडून येणं खूप अवघड आहे. अशा स्थितीतही बीडमध्ये एका कुटुंबानं राजकारणात चांगलीच बाजी मारली असल्याचं पहायला मिळालं आहे. जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ग्रामपंचायतीत एकाच कुटुंबातील चार सदस्य आहेत. या गावात फक्त ४५० मतदारसंख्या असून येथील चाळक कुटुंबातील चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
या ग्रामपंचायतीतील लहुराव चाळक यांचं हे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील लहूराव हे ग्रामपंचायत सदस्य असून त्यांची सून मनीषा यांना सरपंचपदाचा मान मिळाला आहे. तर उपसरपंचपदाचा मान त्यांचा मुलगा महेश यांना मिळाला आहे. तर दुसरी सून सुनीता या देखील सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
या कुटुंबाचा राजकीय वारसा हा सुरुवातीपासूनच आहे. या परिवारातील भगवान चाळक हे सलग २५ वर्षे सेवा सोसायटीचे चेअरमन होते. त्यांच्यानंतर महेश चाळक हे अडीच वर्ष चेअरमन होते. एवढं असतानाही त्यांचं काम आणि गावक-यांबद्दलची आस्था पाहून मोठा विश्वास दाखवत त्यांना निवडून दिलं आहे. त्यामुळे या गावक-यांना विकासाच्या दिशेनं घेऊन जाणं मोठं आव्हान ठरणार आहे.
COMMENTS