बीडमधील राष्ट्रवादीचे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहात करतील –पंकजा मुंडे

बीडमधील राष्ट्रवादीचे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहात करतील –पंकजा मुंडे

मुंबई –  बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतेच पवार साहेबांच्या पक्षाची वाताहत केल्याशिवाय राहणार नाहीत. अशी जोरदार टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नाव न घेता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला असल्याचं दिसत आहे. विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवाराने ऐनवेळी माघार घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची अगतिकता असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीमधील पवार घराण्याचा लॉयल लोकांवर अन्याय होतो आणि अपमानास्पद वागणूक मिळते, त्याचंच फलित म्हणजे सुरेश धस आमच्याबरोबर आहेत. अशी टीकाही यावेळी पंकजा यांनी केली आहे. ‘बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि बंधू रमेश कराड यांनी ऐनवेळी माघार घेतली, राजकारणाच्या इतिहासात असं कधीच झालं नाही. अधिकृत उमेदवार माघार घेतो ही राष्ट्रवादीची अगतिकता आहे. त्यातही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS