मुंबई काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप

मुंबई काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप

मुंबई: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर कामगार नेते आमदार भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. तर कार्याध्यक्षपदी चरणजीत सिंग सप्रा यांची निवड करण्यात आली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच राष्ट्रवादी व शिवसेनेशी समन्वय ठेवून काॅंग्रेसचे अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेस मराठा नेते भाई जगताप यांना मुंबईत पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हे खांदेपालट करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. यांपैकी अध्यक्षपदी सूत्रं अखेर भाई जगताप यांच्याकडे गेली आहेत.

भाई जगताप यांच्या गाठीशी दांडगा अनुभव आहे. पक्षातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे.

 

दरम्यान, मुंबई काॅंग्रेसचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांनी प्रतिक्रिया देताना काॅग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्वसमावेश अशी कार्यकारिणी तयार केली आहे. सर्वांनी समन्वयाने काम करून पक्ष वाढीसाठी काम करु असे सांगितले.

 

 

COMMENTS