भास्कर जाधव यांचा राजीनामा, आज शिवसेनेत घेणार प्रवेश !

भास्कर जाधव यांचा राजीनामा, आज शिवसेनेत घेणार प्रवेश !

औरंगाबाद – कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जाधव यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात आला असून ते आज दुपारी 2 वाजता मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान भास्कर जाधव यांच्यासाठी शिवसेनेनं आज स्पेशल विमानाची व्यवस्था केली होती. स्पेशल विमानाने जाधव रत्नागिरीहून औरंगाबादला गेले. औरंगाबादमध्ये जाऊन त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन आजच पक्ष प्रवेश व्हावा म्हणून शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली होती.

दरम्यान पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार होता. मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे औरंगाबादमध्ये आहेत. अध्यक्ष विधानभवनात नसतील तर त्यांच्या सचिवांकडे राजीनामा अर्ज देता येतो. तो अर्ज सचिव फॅक्स किंवा ईमेलद्वारे अध्यक्ष जिथे असतील तिथे पाठवतात. त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी झाली की राजीनामा मंजूर होतो, अशी सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भास्कर जाधव हे देखील अशाचप्रकारे आज राजीनामा देणार होते. मात्र जाधव यांचा राजीनामा मंजूर होण्यास विलंब अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली होती. या विमानाने जाऊन त्यांनी राजीनामा दिला असून आता लवकरच ते शिवसेनेत दाखल होणार आहेत.

COMMENTS