मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांनी काही जागा सोडण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात काल राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व मंत्री महादेव जानकर यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या 3 तर विधान सभेच्या 25 जागा देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. तसेच या बैठकीत एनडीएसोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा – शिवसेना युतीच्या जागावाटपात मित्र पक्षानं जागा न सोडल्याने हे नेते नाराज आहेत.
दरम्यान भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध शिवसेनेची नाराजी असल्याने रामदास आठवले यांनी आता या जागेसाठीही मोर्चेबांधणी केली असून दोन जागांची मागणी भाजपकडे केली आहे. त्यांनी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली होती, पण ही जागा शिवसेनेकडे असून राहुल शेवाळे यांची ही जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची तयारी नाही. त्यामुळे आता आठवले यांनी ईशान्य मुंबईच्या जागेची मागणी केली आहे. त्याचबरोबर सोलापूर, लातूर, रामटेक यांपैकी एक जागा द्यावी, अशी आठवले यांची मागणी आहे.
तसेच जानकर यांच्या पक्षाने सहा जागांची मागणी केली असली तरी जानकर हे बारामती किंवा माढा येथून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS