महाराष्ट्रात पहिल्यांदाच राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी !

महाराष्ट्रात पहिल्यांदाच राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी !

मुंबई- समाजामध्ये वंचित म्हणून गणल्या गेलेल्या बहुजनांची मोट बांधून तयार झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांची निवड करण्यात आलेली आहे. २३ फेब्रुवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या विराट जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या ही घोषणा केलेली आहे. अशा प्रकारे एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्त होणाऱ्या दिशा शेख या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी प्रवक्त्या आहेत.

“आवाजच नसलेल्या तृतीयपंथी समुदायाच्या व्यक्तीला थेट आपल्या पक्षाचाच आवाज बनविणे, हे भारतातील खऱ्या अर्थाने वंचितांचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकरच करु शकतात. मी आणि आमचा तृतीयपंथी समुदाय यासाठी बाळासाहेबांचा ऋणी आहे,” अशा शब्दांत दिशा शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आतापर्यंत आमच्या समुदायातील काही व्यक्ती आमदार, खासदार झाल्या. मात्र आम्हां तृतीयपंथियांवरील अन्यायाचा आवाज संसदेपर्यंत कधी पोहोचलाच नाही. वंचित बहुजन आघाडीने आम्हांलाच आवाज बनविले ही आम्हां समस्त तृतीयपंथियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. समाजघटकांच्या उतरंडीतील सर्वांत शेवटचा घटक असणाऱ्या आम्हां तृतीयपंथियांना बाळासाहेब आपल्या आघाडीचा आवाज बनवितात यातूनच त्यांच्या प्रगल्भ नेतृत्वाची चुणूक जाणवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे आम्हांला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. तर त्यांचेच नातू बाळासाहेबांनी त्यांच्या आघाडीचा आवाज म्हणून आम्हांला जी संधी दिली ती आम्हां तृतीयपंथियांसाठी नवचैतन्य निर्माण करणारी आहे. यामुळे आम्ही निश्चितच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ. हेटाळणीचे सूर आता कौतुकाचे बोल बोलू लागतील हा आशावाद देखील पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या ७० वर्षांत न्याय न मिळालेले अनेक जातिसमूह या देशांत आहे. त्यांच्यांत नवचेतना निर्माण व्हावी. आपल्या न्याय्य हक्कासाठी, राजकीय हक्कांसाठी त्यांच्यात जागरुकता निर्माण व्हावी, त्यासाठी त्यांनी संघर्ष करावा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झालेली आहे. निव्वळ निवडणुकीपुरतीच ही आघाडी मर्यादित नसेल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रत्येक देशात तृतीयपंथियांचा समूह आहे. तिथे त्यांचे राजकीय हक्क-अधिकार मान्य केले गेले आहेत. भारतात मात्र तृतीयपंथियांचे राजकीय हक्क नेहमीच डावलले गेले. ही आघाडी तृतीयपंथी समुदायास राजकीय दृष्ट्या सक्षम शक्ती बनण्यास मदत करेल. त्यांच्यातील नेतृत्वगुणास वाव देईल. असेही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

COMMENTS