ठाणे – 2014 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवताना ब्लू प्रिंट आणली होती. मात्र, 2017 ला गुजरात निवडणूक लढवताना भाजपवाले ब्लू फिल्मची सीडी काढून निवडणुका लढवत असल्याचा घणाघाती आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गडकरी रंगायतन चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेला राज ठाकरे संबोधित करत आहेत.
राहुल गांधींना घाबरुन भाजपने संपुर्ण पक्ष गुजरात निवडणुकीत कामाला लावला आहे. आत्मविश्वास गमावल्यामुळे सरकारने ठाण्यातील सभेला परवानगी नाकारल्याचा आरोप राज यांनी केला आहे. राहुल गांधींना ‘पप्पू’ समजता तर मग भाजपच्या नेत्यांची फौज गुजरातमध्ये येऊन काँग्रेसविरोधात का बोलते आहे? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली? सरकारडून महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.
फेरीवाल्यांना हटविणे हे सरकारचे काम, मात्र सरकारला जमले नाही म्हणून मनसेला रस्त्यावर उतरावं लागलं. सरकारला सभेची भीती वाटते यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दिसून येते. मनसेला एकटे पाडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे. मात्र महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे हे विसरू नका असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच आजवर मनसेने एकही आंदोलन चुकीच्या गोष्टीसाठी केलेले नाही आमचे प्रत्येक आंदोलन जनतेच्या प्रश्नांसाठीच आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याची कथित सेक्स सीडी बाहेर आली. यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. तसेच तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत हे लक्षात ठेवा असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
COMMENTS