राज्यसभेसाठी भाजपकडून तीन नावं निश्चित ?

राज्यसभेसाठी भाजपकडून तीन नावं निश्चित ?

मुंबई  राज्यसभेच्या 23 मार्चरोजी पार पडणा-या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील सहा जागांपैकी तीन जागांवर या नेत्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावं भाजपच्या राज्य निवड समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राज्य निवड समितीनं या तिघांची निवड केली असली तरी केंद्रीय समितीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. त्यामुळे 3 मार्चरोजी पार पडणा-या केंद्रीय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान विधानसभेचं संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवलं जातं याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. परंतु या तीन जागांवर प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे यांना संधी दिली जाणार आहे. प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. तसेच धर्मेंद्र प्रधान मूळचे ओदिशातील असून, ते विद्यमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली जाणार आहे. तसेची तिसरे नावं म्हणजे नारायण राणे यांचं. काँग्रेस सोडल्यानंतर राणे यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं परंतु शिवसेनेचा विरोध पाहता त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे.

 

COMMENTS