मुंबई – भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना जोरदार धक्का बसला असून लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबईतून सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्य केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती.
किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती. आज अखेर सोमय्या यांना डावलून भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमय्या यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS