भाजपच्या केंद्रीय जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणेंना स्थान !

भाजपच्या केंद्रीय जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणेंना स्थान !

दिल्ली – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढणार अशी घोषणा करणारे नारायण राणे यांचा भाजपच्या केंद्रीय जाहीरनामा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पियूश गोयल आणि राणे या दोनच नेत्यांचा महाराष्ट्रातून या समितीमध्ये समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये 20 जणांचा समावेश आहे. ही समिती पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करणार आहे.

नारायण राणे यांच्या जाहीरनामा समितीतील समावेशामुळे राणे हे आता भाजपसोबत राहणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजप शिवसेना एकत्र आले तर आपण स्वबळावर निवडणूक लढवू असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. भाजपनं राणेंची या समितीमध्ये नेमणूक केली असल्यामुळे आता भाजप शिवसेना युती होणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेनं काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे भाजपनंही स्वबळाची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तसे संकेत दिले होते. आज लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप सर्व जागा लढवणार आहे. त्यादृष्टीनं सर्व जागांवर तयारी सुरू करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.

नारायण राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक असले तरी त्यांनी राज्यसभेची निवडणूक भाजपकडून लढवली होती. त्यामुळे आता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राणे यांच्या पक्षाचे उमेदवार त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवतात की भाजपच्या चिन्हावर  निवडणूक लढवतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. तसंच काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपणही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता राणे आणि मुळचे भाजपचे नेते एकमेकांशी कसे जूळवून घेतात याकडं सगळ्यांच लक्ष लागलंय.

bjp menifesto commiti

COMMENTS