भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास

भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास

मुंबई : केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनावर टिका करीत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील महिला कशा असा सवाल केला. त्यावर दरेकर यांच्या वक्तव्याची आपल्याला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. त्याचा धागा पकडून भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या लेखाजोखा या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी भाजपचे आमदार आशीष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

शेलार म्हणाले, भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो, अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशीष शेलार यांनी निशाणा साधला आहे. सिल्व्हर ओकहे शरद पवार यांचे मंबईतील निवासस्थान असून मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे.

शेलार आपल्या भाषणात म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कृष्ण आहेत. आता सुदर्शन चक्र काढावेच लागेल. ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातून काढा असे म्हणत पुढे शेलारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो.

COMMENTS