भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, प्रवेशाची तारीख निश्चित ?

भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, प्रवेशाची तारीख निश्चित ?

नाशिक – भाजपचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पक्षापासून दुरावलेले विधान परिषदेचे आमदार डॉ. अपूर्व हिरे व त्यांचे बंधू अद्वय हिरे यांनी रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे अपूर्व हिरे व त्यांचे बंधू राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून हिरे कुटुंबीयांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक वाढली असल्याचं दिसून येत आहे. छगन भुजबळ सध्या तुरुंगात असल्याने जिल्ह्याच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हिरे कुटुंबीयांना आपलेसे करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचं दिसत आहे. मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले पक्षाचे नेते शरद पवार यांनी श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. दरम्यान अशातच हिरे बंधूंनी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिरे बंधूंना राष्ट्रवादीध्ये प्रवेश करायचा असून, पुण्याच्या बैठकीत पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे हिरे बंधू लवकरच राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

COMMENTS