जावयाला आमदार करण्यासाठी सासरेबुवांनी कंबर कसली, पुण्याचा खासदार निधी तुळजापुरात खर्च !

जावयाला आमदार करण्यासाठी सासरेबुवांनी कंबर कसली, पुण्याचा खासदार निधी तुळजापुरात खर्च !

महाराष्ट्राला नात्यागोत्याचं राजकारण नवं नाही. कुणी मुलासाठी, कुणी मुलीसाठी, कुणी पत्नीसाठी, कुणी पतीसाठी, कुणी भावासाठी, कुणी बहिणीसाठी, तर कुणी दूरच्या नातेवाईकांसाठी राजकारणात मदत करत असतात. आता हेच पहा ना, जावयाला आमदार करण्यासाठी पुण्यातील एका खासदाराने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. चक्क आपला खासदार निधी जावयाच्या संभाव्य मतदारसंघात खर्च केला जातोय.

पुण्यातील भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे आहेत. तसं पहायला गेलं तर राज्यसभेचा खासदार राज्यात कुठेही त्याचा खासदार निधी खर्च करु शकतो. मात्र मग तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघातच का ?  असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. त्याचं कारणही तसचं आहे. संजय काकडे यांचे जावई तुळजापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांना तिथे मदत व्हावी यासाठी काकडेंचा प्रय़त्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या खासदार निधीतून तुळजापूर मतदारसंघासाठी 40 लाखांचा निधी दिला आहे.

रोहन देशमुख हे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव. देशमुख कंपनीचा व्यवसाय हा सोलापुरात बहरला असला तरी त्यांचं मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सुभाष देशमुख यांनी कधी सोलापूर तर कधी तुळजापूरमधून निवडणूक लढवली आहे. सध्या सुभाष देशमुख सोलापूर जिल्हयातील विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. रोहन देशमुख आता तुळजापूरमधून तयारी करत आहेत.

सुभाष देशमुख यांनी यापूर्वी तुळजापूरमधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नव्हतं. रोहन देशमुख यांनीही गेल्यावेळी अपक्ष म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना यश आलं नव्हतं. आता तुळजापूर मतदारसंघातून रोहन यांना यश मिळते का ? सासरेबुवांची मदत कामी येते का ते पाहण्यासाठी काही महिने वाट पहावी लागेल.

 

COMMENTS