नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला एकतर्फी विजय मिळाला आहे. या विजयामुळे भाजपचा नाशिकमध्ये आत्मविश्वास दुणावला असल्याचं दिसून येत आहे.कारण नाशिकमध्ये सहा महिन्यांनी होणार असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशामुळे नारायण राणेंचा विजय देखील होऊ शकतो असा आत्मविश्वास आता भाजपला आला आहे. त्याचबरोबर तुरूंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजपकडून खेळली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अलिकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राणेंना शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणा-या नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी देण्यात भाजपाला कुठलीही अडचण नसल्याचे बोलले जात आहे. तसेच नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राणे यांना राज्यमंत्रीमंडळात प्रवेश देण्याची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पक्षावर येवून पडली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसे वारंवार संकेतही दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रीमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार करण्यावर भाजप-सेनेत एकमत झाले आहे. त्यावेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.
COMMENTS