जालना – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय मी डोक्यावर केसही उगवू देणार नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. परंतु आता अब्दुल सत्तार हेच भाजपमध्ये जात आहेत. विशेष म्हणजे सत्तार हे रावसाहेब दानवेंच्याच उपस्थितीत भाजप प्रवेश करतील त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण पत्रकारांनी करुन दिली. त्यावर सत्तार यांनी रावसाहेब दानवे मला कंगवाही देतील आणि भांगही पाडून देतील, असं म्हटलं आहे.
दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी जवळपास 40 मिनीटे बंद दाराआड चर्चा केली आहे. या भेटीत प्रवेशाची तारीख फिक्स करण्याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्यात सत्तार यांनी विखेंची भेट घेतली होती.
विखेंच्या बरोबर सत्तार देखील पक्षप्रवेश करणार आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच सत्तार आणि विखे यांच्याबरोबरच काँग्रेसमधील दहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला होता. त्यानंतर आज सत्तार यांनी महाजनांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी इतर कोणकोणते आमदार भाजपमध्ये येतील याबाबतही चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. परंतु या आमदारांची नावे अजून समजू शकली नाहीत. त्यामुळे भाजपात जाणारे ‘ते’ 10 आमदार कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतआहे.
COMMENTS