सांगली – भाजपला जोरदार धक्का, ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश !

सांगली – भाजपला जोरदार धक्का, ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश !

सांगली – आगामी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये सध्या आवकजावक सुरु झाली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे याचा फटका अनेक पक्षांना बसत आहे. सांगली महापालिकेत भाजपला जोरदार धक्का बसला असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते आणि नगरसेवक धनपाल तात्या खोत यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. धनपाल तात्या खोत आणि त्यांच्या पत्नी सौ.सुलोचना खोत हे दोघे ही विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे खोत यांच्या रुपाने भाजपला याठिकाणी जोरदार धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सांगली आणि मिरजच्या मानाने कुपवाडचा विकास होत नाही, शिवाय आमदार गाडगीळ आणि आमदार खाडे यांचा आमदार निधी सुद्धा कुपवाडला मिळत नाही, असा आरोप करत खोत पती-पत्नी यांनी मागील महिन्यात भाजपाला रामराम ठोकला होता. धनपाल तात्या खोत हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. आतापर्यंत कुपवाड शहरावर त्यांचं वर्चस्व राहिले आहे. 1978 पासून कुपवाड नगरपालिका आणि त्यांनतर 1998 साली सांगली महापालिका झाल्यापासून सातत्याने धनपाल खोत हे निवडून येत आहेत. यापूर्वी ते कुपवाडचे नगराध्यक्ष होते, सांगली महापालिकेचे ते स्थायी समितीचे सभापती सुद्धा होते. कुपवाडमध्ये खोत यांचा प्रभाव असून त्याठिकाणी मोठा फटका भाजपला बसणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS