राज्यसभेसाठी भाजपचा चौथा उमेदवारी अर्ज, काँग्रेसची चिंता वाढली !

राज्यसभेसाठी भाजपचा चौथा उमेदवारी अर्ज, काँग्रेसची चिंता वाढली !

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार दिले जाणार होते. परंतु भाजपचा चौथा अर्ज दाखल झाल्यामुळे आता काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन यांच्यासह भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसची चिंता आता वाढली आहे. 23 मार्च रोजी होणा-या या निवडणुकीसाठी 15 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार असून त्यावेळी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपनं जर एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतला नाही तर मात्री काँग्रेसची चिंता वाढणार आहे.

दरम्यान भाजपकडून चारही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केरळ भाजपचे नेते व्ही. मुरलीधरन यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रकाश जावडेकर यांनी याआधीच आपला अर्ज भरला होता. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही निवडणूक अर्ज भरला. मात्र, भाजपच्या खेळीने काँग्रेसच्या गोटात चिंता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपने चौथा उमेदवार रिंगणात कायम ठेवला आणि शिवसेनेने भाजपला साथ दिली तर काँग्रेसचा उमेदवार धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये रंगत आली असून काँग्रेसच्या चिंतेत मात्र मोठी वाढ झाली आहे.

COMMENTS