मुंबई – बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेट असून याचे गंभीर दुष्परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागतील. या अगोदरही मोदी सरकारने नोटबंदी आणि चुकीच्या पध्दतीने कार्यान्वित केलेल्या जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणली आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारच्या प्राथमिकताच चुकलेल्या असून बुलेट ट्रेन हे त्याचे उदाहरण आहे. काँग्रेस पक्षाने या अगोदरच या अव्यवहार्य प्रकल्पाला आपला विरोध स्पष्ट केला होता. जपान कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही त्यांच्या चलनात करावयाची असल्याने जपान कडून कमी दरात कर्ज मिळविले हा मोदी सरकारचा दावा पूर्णपणे चुकीचा आहेत. त्याचबरोबर बुलेट ट्रेन चालवण्याचा दैनंदीन खर्च पाहता हा प्रकल्प तोट्यात जाणार हे स्वयंस्पष्ट आहे. दैनंदीन खर्च भरून काढण्याकरिता बुलेट ट्रेनला दरदिवशी संपूर्ण क्षमतेने म्हणजे 750 प्रवाशांसह मुंबई-अहमदाबाद अशा 26 फे-या माराव्या लागतील. मुंबई-अहमदाबाद विमान प्रवासाचे तिकीट साधारण 3500 रूपयांच्या घरात असताना बुलेट ट्रेनच्ये प्रवासाकरिता काही पटींनी अधिक रक्कम प्रवाशांना द्यावी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. माहितीच्या अधिकारात हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांमध्ये मुंबई-अहमदाबाद या दोन शहरांमधील प्रवासी सेवेकरिता असलेल्या रेल्वे गाडयांमधील 40 टक्के सीट रिकाम्या राहिल्या असून त्यामुळे पश्चिम रेल्वेला 30 कोटी रूपयांचा तोटा झाला आहे. बुलेट ट्रेन हा आतबट्ट्यांचा व्यवहार ठरणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींच्या खड्ड्यात घालण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. त्यातही महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच या प्रकल्पाचा जास्त लाभ होणार असल्याने काँग्रेस पक्ष या प्रकल्पाचा विरोध करत आहे. महाराष्ट्र सरकारनेही या प्रकल्पाचा विरोध करावा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले.
COMMENTS