मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, माहिती तंत्रज्ञान विभागातील डिजिटल उपक्रमांना चालना मिळणार !

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, माहिती तंत्रज्ञान विभागातील डिजिटल उपक्रमांना चालना मिळणार !

मुंबई – राज्यातील दूरसंचारच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसह त्यांच्या देखभालीसाठी तयार करण्यात आलेल्या दूरसंचार पायाभूत सुविधा निर्मिती धोरणास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणाशी सुसंगत करण्यात आलेल्या या धोरणामुळे शासनाच्या डिजिटल उपक्रमांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

कल्याणकारी योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी जनधन-आधार-मोबाईल (JAM) या त्रिसुत्रीवर भर देण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट प्रतीच्या सेवांचा समावेश असलेले दूरसंचार व्यवस्थेचे भक्कम पायाभूत नेटवर्क असणे आवश्यक होते. त्यादृष्टीने आजचा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

या धोरणानुसार दूरसंचार मनोरे, मायक्रो सेल्स, मास्ट्स आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मार्गाचा हक्क (ROW) यासारख्या उपक्रमांसाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालयास एकमेव संपर्क कार्यालय म्हणून नामनिर्देशित करण्यात आले असून माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे प्रधान सचिव हे संपर्क अधिकारी असणार आहेत. या धोरणानुसार लागणाऱ्या आवश्यक परवानग्यांसाठी संचालनालयाकडून सिंगल विंडो पोर्टलची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच दूरसंचारच्या पायाभूत सुविधांसह ऑप्टिकल फायबर केबल जाळ्यांची उभारणी आणि देखभालीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी सर्व विभाग व प्राधिकरणांना जास्तीत जास्त ३० दिवसांची कालमर्यादा असणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

COMMENTS