मुंबई – महाराष्ट्रात होणाऱ्या चार विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. एडीआर या संस्थेने विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून एकूण 52 उमेदवारांपैकी आठ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेलं समोर आलं आहे.
दरम्यान शिवसेनेचे तीनही उमेदवार गुन्हेगारी पर्शवभूमीचे आहेत. तर भाजपाचे 2 उमेदवार गुन्हेगारी पर्शवभूमीचे असल्याचं समोर आलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून 52 पैकी 23 उमेदवार करोडपती असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपचे तीनही उमेदवार करोडपती आहेत. तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार करोडपती आहे. तसेच सगळ्यात जास्त संपत्ती नाशिक शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रताप सोनवणे यांची 58 कोटी असून त्याखालोखाल निरंजन डावखरेंची मालमत्ता 35 कोटींची आहे.
दरम्यान 25 जूनला महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक असून मुंबईत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 25 जूनला मतदान होणार आहे. कोकणात पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे, तर नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS