पवारांना पुणेरी पगडी घालण्याची भाजपची संधी हुकली !

पवारांना पुणेरी पगडी घालण्याची भाजपची संधी हुकली !

पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुणेरी पगडी घालण्याची भाजपची संधी आज हुकली असल्याचं दिसत आहे. कारण आज पुण्यामध्ये महापालिकेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन होतं. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून शरद पवार यांना आमंत्रित केलं होतं. तसेच या कार्यक्रमात पवारांना भाजपकडून पुणेरी पगडी घातली जाणार होती. परंतु या कार्यक्रमालाच शरद पवार यांनी दांडी मारल्यामुळे भाजपची ही संधी हुकली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान या इमारतीचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत पुणेरी पगडी घालून करण्यात आलं. सत्ताधा-यांनी तसा ठरावच केला होता अशी माहिती आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. परंतु त्यांच्यासह सुप्रिया सुळे, अजित पवार हे देखील अनुपस्थित राहिले असल्याचं पहावायास मिळालं. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर तसेच जाहिरातींमधे राष्ट्रवादीच्या नेत्यांना योग्य स्थान देण्यात आलं नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

दरम्यान महापालिकेनं तब्बल ४९ कोटी रुपये खर्चून ही नवीन इमारत उभारली आहे. या नवीन इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा उद्घाटन सोहळा पार पडला.तसेच नेहमीप्रमाणे या कार्यक्रमातही राजकारण्यांनी वादाची परंपरा कायम ठेवली असल्याचं पहावयास मिळालं आहे. इमारतीचे बांधकाम अपूर्ण असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी सत्ताधा-यांनी उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याचप्रमाणे निमंत्रणपत्रिका आणि जाहिरातीतील फोटोंवरूनही आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हा उद्घाटन सोहळा पार पडला.

COMMENTS