शेतक-यांसाठी खूशखबर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वपूर्ण घोषणा !

शेतक-यांसाठी खूशखबर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वपूर्ण घोषणा !

मुंबई – डिजिटल स्वाक्षरी सातबारा सेवा देण्याचा शुभारंभ 1 मेपासून होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज चर्चा केली. कमी वेळेत, कमी श्रमात शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. राज्यात 43 हजार 948 महसुली गावे आहेत. त्यापैकी 40 हजार महसुली गावांचे सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी 250 तालुक्यातील 100 टक्के गावांचे सातबाराचे काम पूर्ण झाले आहे. अशा 30 हजार शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाने हे केलेले ऐतिहासिक काम सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान 1 मेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणारा डिजिटल स्वाक्षरी सातबारा सर्व शासकीय व निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी या संगणकीय सातबाऱ्यावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही. तलाठी, मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांनी अहोरात्र संगणकीकरणाचे काम करुन सातबारा व खाते उतारा तयार करण्याचे काम केले आहे. त्याबद्दल महसूल मंत्री श्री. पाटील व प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS