मुंबई – राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या भेटीत वेगवेगळ्या विषययांवर चर्चा झाली. मात्र या चर्चेत कोणताही राजकीय विषय नव्हता असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अराजकीय चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्याशी विद्यार्थी संघटनेपासूनचा परिचय आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली असा दावा पाटील यांनी केला आहे. तसंच कोल्हापूरला मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच दिवशी दौरा आहे. त्यामुळे मुंबईतून एकाच विमानाने प्रवास करण्याची विनंती चंद्रकांत दादा पाटील यांनी उद्धव यांना केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी ती विनंती मान्य केली नाही. दोघींची वेळ वेगळी असल्यामुळे विनंती मान्य झाली नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान चंद्रकांत पाटील हे विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची चर्चा आहे. शिवेसनेनं भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडं केल्याचं कळंतंय. मात्र चर्चेतून उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिसाद दिला याबाबत माहिती मिळू शकली नाही. येत्या 7 डिसेंबरला विधान परिषदेची निवडणूक आहे. नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक होत आहे.
राणे निवडणुकीत उभे राहिले तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील मातोश्रीवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राणेंना शिवेसनेचा विरोध पाहता भाजप वेगळा उमेदवार देण्याची शक्यता आहे. मात्र त्यावर तरी शिवसेनेचे समाधान होईल की नाही याबाबत साशंकता आहे. राणेंना मंत्रिमंडळात घेऊ नये या बोलीवर शिवेसना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकते. अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार दिला तर त्याला शिवसेना पाठिंबा देऊ शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
COMMENTS