विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला सरकारचं विश्वास प्रस्तावाने उत्तर !

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला सरकारचं विश्वास प्रस्तावाने उत्तर !

मुंबई – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधकांनी माडलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी फडणवीस ससरकारनं खेळी केली असून अविश्वास प्रस्तावाला सरकारनं विश्वास प्रस्तावाने उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरील विश्वासाचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच आवाजी मतदानाने अध्यक्षांवरील विश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनंही अनुमोदन दिलं आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला होता. विरोधकांनी दिलेला अविश्वास प्रस्ताव चर्चेला का आणला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. तसेच यादरम्यान विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी परस्पर विरोधी घोषणाबाजी दिली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

तसेच सरकारी पक्षाकडून अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव आम्ही सभागृहात ५ मार्च रोजी आणला होता. तो चर्चेला घ्यावा अशी आम्ही मागणी केली होती. त्यावेळी योग्य वेळी निर्णय घेऊन असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होतं पण सरकारने तो अविश्वास ठराव चर्चेला न आणता विश्वास ठराव मांडला असल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे. तर यापूर्वी सभागृहात असं झालं आहे. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रीमंडळावरील विश्वास दर्शक ठराव मांडला होता आणि तो मंजूर केला होता. आजही नियमानुसार कामकाज झालं असल्यामुळे आता विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS