नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या लाभार्थ्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांनी धमकावल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हा आरोप केला होता. सरकारच्या लाभार्थी च्या शौचालय जाहिरातीत सहभागी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मोहमुख येथील फुनाबाई गुलाब पवार यांना धमकवल्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री केला होता.
या आरोपाची शहानिशा करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहमुख गाव गाठलं. वाघ यांच्यासोबत धमकीचा आरोप असलेल्या डॉ. भारती पवार आणि इतर पदाधिका-यांनी गावक-यांसमोर लाभार्थी फुनाबाई पवार यांची भेट घेतली. तसंच त्यांनी कोणी धमकावलं का असा प्रश्नही विचारला. त्यावर फुनाबाई पवार यांनी आपण यांना ओळखत नाही आणि त्यांनी धमकावलं नाही असंही सांगून टाकलं.
यापुर्वी पुणे जिल्ह्यातील दोन लाभार्थ्यांच्या प्रकरणावरुन माध्यमांनी सरकारची पोलखोल केली होती. त्या दोन्ही लाभार्थ्यांना आघाडी सरकारने मदत केल्याचं पुढं आलं होतं. आता या प्रकरणात राष्ट्रवादीच्या प्रत्युत्तरानंतर मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी कुठलीही खातरजमा न करता विरोधी पक्षातील महिला पदाधिका-याची बदनामी केल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. अशा पद्धतीने राज्यातील महिलांची बदनामी करणे हे राज्याच्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांना शोभत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी काय आरोप केला होता आणि त्यावर लाभार्थी पवार यांनी काय म्हटलं आहे. पहा खालील व्हिडिओ….
COMMENTS