कोळसा घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी !

कोळसा घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी !

दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री अडचणीत सापडले आहेत. काँग्रेस आघाडीच्या काळात झालेला कोळसा घोटाळा त्यांच्या अंगलट आला आहे. दिल्ली विशेष न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. मधू कोडा असं या माजी मुख्यमंत्र्यांचं नाव असून त्यांना या घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. याच बरोबर माजी सचिव एच. सी. गुप्तांसह इतर चार जणांना यामध्ये दोषी ठरवण्यात आलं असून गुरुवारी त्यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे.

यापूर्वीही अनेक प्रकरणांमुळे मधू कोडा चर्चेत राहिले होते. यापूर्वी त्यांच्यावर निवडणूक आयोगानं तीन वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. खर्चाचा योग्य हिशोब न दाखविल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर कोळसा घोटाळा प्रकरणात ते दोषी ठरल्यामुळे त्यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अनियमित पद्धतीनं खाण वाटप करण्याचा त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे. त्यांच्यासह सर्व आरोपींना कट रचणं आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं आहे.

मधू कोडा यांनी राजकीय प्रवासात अनेक भूमिका बजावल्या आहेत. २००६ मध्ये ते झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपला राजकीय प्रवास ऑल झारखंड स्टुडंट युनियनपासून केला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही क्रियाशील होते. बाबुलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना तिकीट दिलं नसल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवून जिंकले होते. कोळसा घाटाळ्यामध्ये दोषी ठरल्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी त्यांना याबाबत काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS